
अभिलेख पाहणी, सेतू केंद्र व टसर सिल्क युनिटला भेटी; आमदार राजू कारेमोरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा
भंडारा : महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याचा दौरा करून महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यालयांतील अभिलेख व दस्तऐवजांचे व्यवस्थापन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दौऱ्याच्या प्रारंभी खारगे यांनी भंडारा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपनिबंधक प्रकाश ढगे यांनी दैनंदिन कामकाज, दस्तऐवज व्यवस्थापन व नागरिक सेवांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी मोहाडी येथील तहसील कार्यालय, सेतू केंद्र आणि आंधळगाव येथील प्रसिद्ध टसर सिल्क युनिटला (Tasar Silk Unit) भेट देऊन तेथील उत्पादन प्रक्रिया, कार्यपद्धती व उपक्रमांचा आढावा घेतला. तुमसर येथील उपनिबंधक (मुद्रांक) कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
तुमसर भेटीदरम्यान स्थानिक आमदार राजू कारेमोरे यांनी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तुमसर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे आणि महसूल विभागाशी संबंधित स्थानिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. दौऱ्यादरम्यान खारगे यांनी विविध ठिकाणी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.



