गडचिरोली पोलीस व CRPF ची मोठी कारवाई: नक्षल सप्ताहादरम्यान माओवाद्यांचे १४ अग्निशस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त
घातपाताचा कुटिल डाव उधळला, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कौतुक

गडचिरोली, ४ ऑगस्ट : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या जवानांनी माओवाद्यांचा मोठा घातपाती डाव उधळून लावत एक अत्यंत यशस्वी कारवाई केली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीखाली पुरून ठेवलेला १४ अग्निशस्त्रांचा साठा आणि स्फोटक साहित्य सुरक्षा दलाने जप्त केले आहे. नव्याने स्थापन झालेल्या पोमके (पोलीस मदत केंद्र) बंगाडी हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली.
घातपाताचा कुटिल डाव उधळला
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता अंतिम टप्प्यात आली असून, सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या व मोठ्या घातपाती कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी सीमेवरील दुर्गम जंगलात शस्त्रे व स्फोटके लपवून ठेवली होती. विविध नक्षल सप्ताह व आगामी काळात या शस्त्रांचा वापर करण्याचा माओवाद्यांचा कट होता. यापूर्वी २३ मे, २७ मे आणि २७ जून २०२६ रोजी झालेल्या यशस्वी कारवायांच्या मालिकेत आता १ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या प्रभावी कारवाईची भर पडली आहे.
विशेष अभियान आणि शोधमोहीम
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै २०२६ रोजी विशेष शोधमोहीम आखण्यात आली. प्राणहिता येथील विशेष अभियान पथकाच्या ४ तुकड्या, बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) चे १ पथक आणि CRPF च्या पथकाने कुमनार जंगल परिसरात वेढा घातला. १ ऑगस्ट रोजी बीडीडीएस पथकाने कसून तपासणी केली असता जमिनीखाली लपवलेला शस्त्रसाठा उघडकीस आला.
जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा व साहित्य:
एस.एल.आर. रायफल: ०१ नग
.३०३ रायफल: ०१ नग
१२ बोअर रायफल: ०७ नग
सिंगल शॉट रायफल: ०३ नग
बीजीएल लाँचर्स: ०२ नग
एस.एल.आर. मॅगझिन: ०३ नग
आय.ई.डी. स्फोटक: ०१ नग
बॅटरी व इतर साहित्य: ०२ नग
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कौतुक
ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल व बीडीडीएस पथकाने पार पाडली. या धाडसी कामगिरीबद्दल सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.



