गडचिरोलीविदर्भ

कोठी–पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या संरचनेचे नुकसान; उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 

गडचिरोली, दि. ५ : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा–कोठी–रेगाडंडी–पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र. ६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी पुलाच्या तांत्रिक स्थितीबाबत खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पूल हा सॉलिड स्लॅब राफ्ट फाउंडेशन सबमर्सिबल ब्रिज प्रकारातील असून त्याची लांबी १०५ मीटर (१५ स्पॅन × ७ मीटर) व रुंदी ७.५० मीटर आहे. नदीपात्रापासून पुलाची उंची सुमारे ६.५ मीटर असून सन २०२२ मध्ये सुमारे ४.१० कोटी रुपये खर्चून त्याची उभारणी करण्यात आली होती.

दिनांक २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत एटापल्ली परिसरात २०० ते २१० मिमी इतका अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला. या काळात पुलावरून सुमारे २ ते २.५ मीटर उंचीपर्यंत पाणी वाहत होते. घटनास्थळी करण्यात आलेल्या तांत्रिक पाहणीत १५ स्पॅनपैकी ५ स्पॅन सुरक्षित, १ स्पॅन नदीपात्रात खचलेला, २ स्पॅन नुकसानग्रस्त, ३ स्पॅनमध्ये संरचनात्मक हालचाल, तर उर्वरित ४ स्पॅन सुरक्षित असल्याचे आढळून आले.

प्राथमिक तांत्रिक निरीक्षणानुसार, नदीकाठाची धूप तसेच पाया परिसरातील बदलांमुळे राफ्ट फाउंडेशनजवळ पोकळी निर्माण होऊन पुलाच्या संरचनेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या बाबींची सविस्तर तांत्रिक तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालानुसार पुलाची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार पुनर्बांधणीची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, घटनेची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून पुलाच्या नुकसानीस कारणीभूत बाबींचा सर्वंकष तपास केला जाईल. चौकशी अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button