
एकाच दिवशी दोन आदेश; महत्त्वाच्या ठाणेदारांवर कायम विश्वास, कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न
गडचिरोली, दि. ० ६ ऑगस्ट : जिल्हा पोलीस दलात प्रशासनाने मोठा खांदेपालट करत एकाच दिवशी दोन स्वतंत्र आदेशांद्वारे तब्बल ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही ठाणेदारांवर मात्र प्रशासनाने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. या व्यापक फेरबदलामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
फेरबदलानुसार पोलीस निरीक्षक कैलास गवते यांची आरमोरी येथून धानोरा येथे, उपअधीक्षक (मुख्यालय) स्वप्नील इज्जपवार यांची देसाईगंज येथे, तर अजय जगताप यांची देसाईगंज येथून कुरखेडा येथे बदली करण्यात आली आहे. तसेच महेंद्र वाघ यांची कुरखेडा येथून आलापल्ली, दीपक डोर्ले यांची चामोर्शी येथून कोरची, महादेव ढाको यांची चामोर्शी नियंत्रण कक्षात, सुनील बागल यांची मुलचेरा, बाबासाहेब दुग्धाळ यांची सिरोंचा आणि सचिन झनक यांची इंटेलसेल अहेरी येथून आरमोरी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा मुख्यालयातील गडचिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांना त्यांच्या विद्यमान पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातील गुन्हे नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाई, तपासातील परिणामकारकता आणि कायदा-सुव्यवस्थेतील कामगिरीची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. तसेच एटापल्ली आणि अहेरी येथील ठाणेदारांनाही त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे.
या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील ६८ पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांपैकी जवळपास ६० ठिकाणांवरील प्रभारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भागातील पोलीस व्यवस्था अधिक सक्षम करणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे, हा या व्यापक फेरबदलामागील प्रमुख उद्देश असल्याचे बोलले जात आहे.



