जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदलीसाठी नागपुरात बेमुदत ठिय्या आंदोलन; कारवाईच्या मागणीला पुन्हा जोर
डॉ. वर्षा लहाडे यांच्या बदलीसाठी अमिता मडावी यांचे बेमुदत आंदोलन

डॉ. वर्षा लहाडे यांच्या बदलीसाठी अमिता मडावी यांचे बेमुदत आंदोलन
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावरील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्या अमिता मडावी यांनी शुक्रवारपासून नागपूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
अमिता मडावी यांनी आरोप केला आहे की, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या अनेक मूलभूत समस्या प्रलंबित असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासन, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, दिव्यांग विभागातील गैरव्यवस्था तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. डॉ. वर्षा लहाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, काही डॉक्टरांनी राजीनामेही दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यापूर्वी डॉ. लहाडे यांच्याविरोधातील तक्रारींची आरोग्य उपसंचालकांच्या चौकशी समितीकडून चौकशी सुरू असल्यामुळे आंदोलन १५ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले होते. मात्र, चौकशी पूर्ण होऊनही कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई न झाल्याचा आरोप करत अमिता मडावी यांनी ७ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
डॉ. वर्षा लहाडे यांच्यावरील सर्व आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांची गडचिरोली येथून तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे किंवा आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.



