गोंदियाविदर्भ

व्यक्तीमत्व घडविण्याचे काम पुस्तकेच करतात – प्रदिप दाते

गोंदिया ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन

गोंदिया : ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना मिळते. वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्तच आहे. पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते, आपले विचार प्रगल्भ होतात. महापुरुषांची पुस्तके वाचली तर त्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. ज्ञान प्राप्ती सोबतच व्यक्तीमत्व घडविण्याचे काम पुस्तकेच करतात, असे मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते यांनी व्यक्त केले.

श्री शारदा वाचनालय, गोंदिया येथे आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-2024 कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालय संचालक मुंबई अशोक गाडेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, सहायक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, सचिव डी.डी. रहांगडाले, सदस्य विनायक अंजनकर, मनोहर म्युन्सीपल हायस्कुलचे प्राचार्य भूवनकुमार बिसेन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रदिप दाते म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला यामुळे पुस्तके उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे करियर घडविण्याचे काम पुस्तके करतात. आपण महापुरुषांची पुस्तके वाचली पाहिजे. पुस्तके वाचल्याने आपली विश्लेषणात्मक तर्कशक्ती सुधारते. तुम्ही जितके जास्त पुस्तके वाचाल तितकी तुमची कल्पनाशक्ती विस्तारित होईल. पुस्तके वाचल्याने एकाग्रता वाढते. पुस्तके ही जोडीदारा प्रमाणेच आपल्या जीवनाचा अभिभाज्य भाग आहे. पुस्तके वाचल्याने स्मरणशक्ती तर सुधारतेच सोबतच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही वाढते. आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून जग खुपच पुढे गेले आहे. मोबाईलमुळे आता पुस्तकांचा आणि आपला संबंध दुरावल्यासारखे वाटत आहे. आपले जीवन जगण्याची साधने काय आहेत हे आपल्याला समजले पाहिजे. सकारात्मक विचार करण्याची आपल्यात शक्ती असायला पाहिजे. पुस्तके आपल्यात समज निर्माण करतात, ती विचारशक्ती वाढविण्याची चालना देतात.

ग्रंथांमध्ये व पुस्तकांमध्ये प्रेरणा असते. आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम पुस्तके व ग्रंथ करतात. ग्रंथांचे महत्व वाढविण्यासाठी ग्रंथ विकत घेवून ते वाचले पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. आता मराठा भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात हिंदी भाषिक नागरिक असले तरी मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत. गोंदिया नगरीला एक वेगळी सांस्कृतिक व नाट्यपरंपरा लाभलेली आहे. वाचन चळवळीला चालना मिळावी याकडे वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रंथालय चळवळीला समृध्द करता आले पाहिजे, त्यासाठी ग्रंथालय बळकटीकरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मनोगत व्यक्त करताना अशोक गाडेकर म्हणाले, राज्यात ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील गोंदिया येथील दुसऱ्या ग्रंथोत्सवात उपस्थित असल्यामुळे मला आनंद झालेला आहे. महाराष्ट्रात 18 हजार 150 ग्रंथालये असून 7 कोटीच्या घरात ग्रंथसंपदा आहे. तसेच ग्रंथालयात 47 लाख पुस्तकांचा संग्रह आहे. ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी पुस्तके/ग्रंथांचे स्टॉल लावून विक्री करण्यात यावी, जेणेकरुन वाचकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल व त्यांना हवी असलेली पुस्तके सहजरित्या प्राप्त होण्यास मदत होईल. राज्यातील ग्रंथालयाचे आता डिजीटलायझेशन करण्यात आले असून त्याचा लाभ वाचकांनी घ्यावा. प्रत्येकाने सकारात्मक विचार केला तर वाचनाने जगण्याचा मार्ग सुकर होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्मरणात ठेवावे. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केले पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीतून यश संपादन करुन आपल्या आई-वडिलांचे नावलौकीक करा. आपल्या लेखनीमध्ये जबरदस्त शक्ती असते. ग्रंथोत्सवाचे आयोजन लाख मोलाचे आहे असे त्यांनी सांगितले.

एम. मुरुगानंथम यांनी सांगितले की, मानवाच्या जीवनात पुस्तकांना/ग्रंथांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुस्तके वाचल्याने आपले विचार प्रगल्भ होत असतात. मी सुरुवातीपासूनच ग्रंथालयाचा वाचक आहे. भाषा वेगळी असली तरी आत्मा एकच आहे. आपल्याला पुस्तकातून जग दिसते, त्यामुळे मानसाचे आयुष्य घडते. पुर्वी मोबाईल व इतर यंत्रणा नसतांना सुध्दा ग्रंथालयात जावून वाचनाबद्दल गोडी निर्माण करुन सखोल ज्ञान प्राप्त करु शकलो. स्वत:साठी जगतांना इतरांसाठी सुध्दा मदतीचा हात दाखवा. मनुष्य किती जगला हे महत्वाचे नसून कसा जगला, कोणासाठी जगला हे त्यापेक्षा कितीतरीपट अधिक महत्वाचे आहे. आजच्या तरुण पिढीने ग्रंथालयात जावून पुस्तके वाचली पाहिजे यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. ग्रंथालयात आवश्यक सोई-सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पुस्तके वाचल्याने आपले विचार प्रगल्भ होत असतात. पुस्तके वाचन केल्याने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ सर्वांनी वाचला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ असायला पाहिजे. कर्तृत्वाने मोठे व्हायचे असेल तर अवांतर पुस्तके वाचा व वाचनाने मोठे व्हा. महापुरुषांचे ग्रंथ वाचावे व त्यांचे अनुकरण करण्याचे प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ॲड. श्रावण उके व डी.डी. रहांगडाले यांना ग्रंथालय कार्यकर्तासाठी ग्रंथमित्र पुरस्काराने तर शिवकुमार शर्मा व जगदिश बडगे यांना ग्रंथालय सेवकांसाठी ग्रंथमित्र पुरस्काराने ग्रंथ भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.

साहित्यिक प्रकाश येदलाबादकर म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात हिंदी भाषिक लोकं जास्त प्रमाणात आहेत. वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रंथोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीत वाढ व्हावी तसेच पुस्तके वाचनाची सवय लागावी. कारण महापुरुषांची पुस्तके वाचल्याने त्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळाला पाहिजे तसेच ग्रंथाला वाचक मिळाले पाहिजे यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाचन संस्कृती वाढावी, वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यात ग्रंथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो असे त्या म्हणाल्या.

या गोंदिया ग्रंथोत्सवात शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, सार्थक बुक सेल्स अकोला, साई ज्योती पब्लिकेशन नागपूर, प्रज्ञा सार्वजनिक वाचनालय बिजेपार ता.सालेकसा, सुधीर प्रकाशन गणेशनगर बोरगाव (मेघे) वर्धा, ओम साई पब्लिशर्स व डिस्ट्रीब्युटर्स नागपूर यांचे बुक स्टॉल लावण्यात आलेले आहेत. सदर बुक स्टॉलवर जावून पुस्तके व ग्रंथ विकत घेवून त्याचे वाचन करावे, असे आवाहन ग्रंथोत्सव आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी केले. कार्यक्रमास सहायक माहिती अधिकारी कैलाश गजभिये, अंकुश कटरे, सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मनपे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button