
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात २६ जानेवारी रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विद्यालयात राष्ट्रिय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता ध्वजारोहक म्हणून विद्यालायाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून गडचिरोली येथील प्रतिष्ठित नागरिक व भाजपा जिल्हाध्यक्ष वैद्यकीय आघाडीचे डॉ. अविनाश शंखदरबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. रिंकू पापडकर, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेड़े, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी, मार्कंडा कंसोबा ग्रामपंचायत सदस्या अल्का गोसावी, बनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहक संजीव गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्य बोलताना ते म्हणाले की, प्रजासत्ताक हा आपला राष्ट्रीय सन आहे, हा असा कार्यक्रम आहे, ज्याद्वारे भारत देखील आपली सामरिक आणि मुत्सद्दी शक्ती प्रदर्शित करतो आणि जगाला संदेश देतो की आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम भारताच्या परराष्ट्र धोरणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. कारण या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विविध देशांच्या प्रमुख पाहुण्यांच्या आगमनामुळे भारताला या देशांशी संबंध वाढवण्याची संधी मिळते. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, हा दिवस आपल्याला आपल्या प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देतो.
प्रसंगी डॉ. अविनाश शंखदरबार व रिंकू पापडकर यांनीही उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थी हे पोलीस कवायत मैदानावर उपस्थित झाले. त्यामध्ये विद्यालयाच्या एनसीसीच्या सिनिअर, ज्युनिअर व साधारण गटातून एक अशा तीन पथकांनी मनमोहक असे पथसंचलन सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे योगेश आसमवार यांनी केले तर आभार गजानन अनमुलवार यांनी मानले.



