क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

सागवान लाकडाची तस्करी ; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

कोरची : येथून १० किलोमीटर अंतरावरील असलेल्या बेतकाठी जंगल परिसरातून सागवानाची तस्करी करीत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड घालून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वनाधिकाऱ्यांनी एकास ताब्यात घेतले असून, सहा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

कोरची तालुका जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात साग, शिसम, बिजा अशी मूल्यवान प्रजातीचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. या तालुक्याला लागूनच छत्तीसगढ राज्याची सीमा आहे. परंतु हा भाग नक्षलग्रस्त असल्याने पोलिस वा वनविभागाचे कर्मचारी हिंमतीनेच बाहेर पडतात. याचाच फायदा घेत काही लोक लाकूड तस्करी करीत आहेत.

बेतकाठीच्या जंगलात ३०-४० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सागवान रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. आता हे वृक्ष मोठे झाले आहेत. त्यामुळे या वृक्षांवर तस्करांचा डोळा आहे. तस्कर लोक गावाजवळच्या किंवा त्यांच्या ओळखीच्या लोकांना मोठी रक्कम देऊन सागवान वृक्षांची तस्करी करतात. १६ मार्चच्या रात्री सागवान लाकडांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून २.६६ घनमीटरची सागवानाची १५ लाकडे, एक पिकअप, एक ट्रॅक्टर, मोटारसायकल व लाकूड कापण्याची अवजारे असा एकूण २३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी चालक सुरेश रामलाल होळी (वय २५), रा. कुंभकोट यास ताब्यात घेतले. अन्य सहा आरोपी फरार आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी एल.एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बी.एस. अनकरे, डी.आर. ढोरे, एस. एन. राठोड, एम.बी. कुंजाम, एस.डी. मसराम, एन.आर. मिनलामी, सी.एन. मडावी, व्ही.एन. कवडो, यू.यू. नाकाडे, शिवनाथ बोगा, सुग्रीव सर्पा यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button