गडचिरोलीविदर्भ

आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर भीषण अपघात ; ट्रकच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

अहेरी : आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर दिना नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (दि. ३) दुपारी एक भीषण अपघात झाला. सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पत्नी कमला येलेवार (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती संजय येलेवार गंभीर जखमी झाले.

बोरी जवळील राजपूर पॅच येथील रहिवासी असलेले संजय येलेवार मासे विक्रीचा व्यवसाय करतात. ते आपल्या पत्नीसह दुचाकीने अहेरी येथील आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी जात होते. दरम्यान, दिना नदीच्या पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कमला येलेवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच अहेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त नातेवाईकांनी ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या आलापल्ली-लगाम रस्त्याच्या कामावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने या मार्गावर आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button