महाराष्ट्रमुंबई

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना, कार्यक्रम, उपक्रम आणि उपलब्ध सेवा-सुविधांची माहिती वर्तमानपत्रे तसेच इतर माध्यमांद्वारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत दिले.

राज्यात आरोग्याच्या विविध योजना राबवल्या जातात आणि रुग्णालयांमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. आरोग्य विभाग चांगले काम करत आहे, याचं माध्यमांद्वारे वृत्तांकन झालं पाहिजे, असं आबिटकर म्हणाले. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्वरित खुलासा करून वस्तुस्थिती मांडली पाहिजे. यासाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी सजग राहून कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मुंबईतील आयुक्तालय येथे राज्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी राज्यभरातील आरोग्य विषयक जनजागृती आणि प्रसिद्धी उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांत राबवण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांविषयी माहिती घेऊन, हे उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे कसे राबवता येतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांना माध्यमांद्वारे प्रभावी काम करता यावे यासाठी प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. संजय कुमार जठार तसेच सर्व जिल्ह्यांतील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button