गोंदियाभंडाराविदर्भ

नोकरीच्या शोधात निघालेल्या गोंदियातील दोन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

टाटा मॅजिक आणि डस्टर कारच्या धडकेत दोघांचा जागीच अंत ; परिसरात शोककळा

भंडारा : नोकरीच्या शोधात नागपूरकडे निघालेल्या गोंदिया जिल्ह्यातील दोन तरुणांचा साकोलीजवळ झालेल्या एका विचित्र आणि भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवार, ३१ मे रोजी दुपारी घडली. जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८) आणि यादवराव गोपालराव वधारे (वय ३६) अशी मृतांची नावे असून, दोघेही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील रहिवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि यादवराव हे एमएच ३५/एएम ०६७० या क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरकडे जात होते. साकोलीजवळील ऊकारा फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. एमएच ३५/के १५४३ या क्रमांकाच्या टाटा मॅजिक गाडीच्या चालकाने प्रवाशांना उतरवून अचानक आपली गाडी महामार्गावर वळवली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकलने टाटा मॅजिकला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. त्याच क्षणी, मागून वेगाने येणाऱ्या एमएच ०४/जीजे ४३१८ या क्रमांकाच्या डस्टर कारने दोघांना चिरडले. या कारचा चालक अशोक भैय्यालाल काळसर्पे (रा. कवळी टोला, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) हा होता.

या भीषण अपघातात यादवराव वधारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जितेंद्र उपराडे हा गाडीखाली अडकला आणि काही अंतर फरफटत गेला. त्याला गंभीर अवस्थेत तातडीने साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर टाटा मॅजिकचा चालक आपली गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, वाहतूक शाखेचे निरीक्षक जितेंद्र बोरकर आणि साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

अशोक भैय्यालाल काळसर्पे यांच्या तक्रारीवरून टाटा मॅजिकच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वुडुले, संदीप भगत आणि महेश नेताम करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दोन तरुण मुलांचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button