चंद्रपूरविदर्भ

वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी चंद्रपुरात ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन

वीज सुरक्षेची जनजागृती ; महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर : वीज ग्राहकांमध्ये वीज अपघातांबद्दल जागरूकता निर्माण होऊन, अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे, या उद्देशाने महावितरणने आज ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन केले. चंद्रपूरचे मुख्य अभियंता हरीश गजबे, चंद्रपूर मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, आणि जिल्हा विद्युत निरीक्षक कोलते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात झाली.

१ जून रोजी झालेल्या या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनमध्ये चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता हरीश गजबे, चंद्रपूर मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा विद्युत निरीक्षक कोलते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) सुशील विखार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, तसेच कार्यकारी अभियंते दारव्हेकर, पेगलपट्टी, वंदिले, शहाडे, निचत (चाचणी विभाग), जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) गणेश चाचेरकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ ते ६ जून २०२५ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. याच सप्ताहाचा एक भाग म्हणून, आज चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते आझाद गार्डन (शहरात) आणि परत मुख्यालय बाबूपेठपर्यंत धावले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते, तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही दिल्या. ‘विद्युत भवन’ या परिमंडळ कार्यालयात परतल्यानंतर मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आणि विद्युत निरीक्षक कोलते यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button