
महावितरणचे ‘शून्य अपघात‘ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष उपक्रम; वृक्षारोपण व प्रात्यक्षिकांचे आयोजन
चंद्रपूर : वीज ग्राहकांमध्ये वीज अपघातांबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे, या उद्देशाने महावितरणने ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) चे आयोजन केले होते. चंद्रपूरचे मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता (चंद्रपूर मंडळ) संध्या चिवंडे, आणि अधीक्षक अभियंता (पा. आ.) रमेश सानप यांच्या हस्ते या ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ बाईक रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
०५ जून रोजी ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ बाईक रॅलीला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता हरीश गजबे, चंद्रपूर मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, रमेश सानप (अधीक्षक अभियंता, पा. आ.), विद्युत निरीक्षक कोलते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा. सं.) सुशील विखार, आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, तसेच कार्यकारी अभियंते दारव्हेकर, वंदिले, शहाडे, निचत (चाचणी विभाग) आणि सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत दि. १ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ येथून जटपुरा गेट, वन अकादमी मार्गे परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत बाईक रॅली काढून विद्युत सुरक्षा सप्ताहाविषयी जनजागृती केली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते, तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. ‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात परत आल्यानंतर मुख्य अभियंता हरीश गजबे आणि अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच, वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संवर्धन करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे उपाध्याय व देशमुख (अंबुजा सिमेंट) यांनी विद्युत सुरक्षाबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



