जिल्ह्यात वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश ; ४२ दुचाकी जप्त

सात आरोपींना अटक
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराज्यीय वाहन चोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गडचिरोली आणि छत्तीसगडमधून चोरलेल्या तब्बल ४२ दुचाकी वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कठोर कारवाईच्या निर्देशानंतर ही यशस्वी मोहीम फत्ते झाली.
वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशन, उप-पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांना (पोमकें) कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने, पोमकें सावरगाव येथे ९ जून २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) अन्वये अप.क्र. १७/२०२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करत असताना, सावरगाव पोलिसांनी साक्षीदार आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने विनयप्रकाश धरमु कुजुर, रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली या आरोपीची ओळख पटवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, विनयप्रकाशला राजनांदगाव कारागृहातून ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
विनयप्रकाशकडे सखोल चौकशी केली असता, तो आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहने चोरून, त्या चोरीच्या वाहनांचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीने त्यांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी विनयप्रकाशचे साथीदार १) रवनू दसरु पदा, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, २) राकेश छबीलाल बादले रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, ३) रामु झिकटुराम धुर्वे, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, ४) संजय मुन्ना लकडा रा. कवडू ता. राजपुर जि. बलरामपुर (छ. ग.), ५) राजेंद्र चूंदा लकडा रा. कवडू ता. राजपुर जि. बलरामपुर (छ. ग.), ६) राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा. तळेगाव ता. कुरखेडा जि. गडचिरोली यांना अटक केली. अटक केलेल्या सर्व ७ आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोमकें सावरगाव आणि स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा) गडचिरोली यांनी आपल्या तपास कौशल्याचा वापर करून आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा, कोटगुल, धानोरा या पोलीस स्टेशनमध्ये तसेच छत्तीसगडमध्ये दाखल असलेले एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे गडचिरोलीसह छत्तीसगडमधील एकूण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तपासाअंती अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. विश्वंभर कराळे, पोमकें सावरगाव हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा (अतिरिक्त कार्यभार) रविंद्र भासले यांचे मार्गदर्शन लाभले. स्थागुशा गडचिरोलीचे पोनि अरूण फेगडे, सपोनि भगतसिंग दुलत, पोमकें सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे, पोउपनि राजेंद्र कोळेकर, मपोउपनि सिध्देश्वरी राऊत आणि स्थागुशा गडचिरोली व पोमकें सावरगावच्या अंमलदारांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.



