गडचिरोलीविदर्भ

मार्कंडा मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती द्या – खा. डॉ. नामदेव किरसान

दहा वर्षांपासून काम प्रलंबित असल्याने भाविकांमध्ये नाराजी; महाराजांच्या पदयात्रेमुळे मुद्दा पुन्हा ऐरणीवर

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने कामाला सुरुवात केली असली तरी, ते अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही बाब गांभीर्याने घेत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मार्कंडा येथे भेट देऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान, खासदार डॉ. किरसान यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या धीम्या गतीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी कामास गती देऊन ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यापूर्वीही, डॉ. किरसान यांनी एक वर्षापूर्वी मंदिर परिसरात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर काही प्रमाणात कामाला सुरुवात झाली होती.

मंदिराच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्यामुळे हरनघाटचे मुरलीधर महाराज यांनी या कामाला चालना देण्यासाठी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीकाठी १०८ दिवसांची पदयात्रा सुरू केली आहे. ही परिक्रमा रोज ५१ किमी या हिशोबाने मार्कंडा-रामाडा-घारगाव-हरनघाट-उसेगाव-शिरशी-लोंढोली-चिचडोह मार्गे पुन्हा मार्कंडा येथे होत आहे. या उपक्रमाची माहिती मिळताच खासदार डॉ. किरसान यांनी मुरलीधर महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिप्राय जाणून घेतले आणि तातडीने मार्कंडा मंदिर परिसरात जाऊन पुनर्बांधणीच्या कामाची थेट पाहणी केली.

यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी डॉ. अरुण मलिक, नीरज तिवारी, शुभम कोरे, नायब तहसीलदार कावळे, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तसेच गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, विजय लाड, गौरव येनप्रेड्डीवार, सरपंच संगीता मोगरे, माजी सरपंच मुखरु शेंडे, सुरेश बंडावर, मनोज हेजीब, रामू महाराज गायकवाड, राजू मोगरे, अमर मोगरे, वर्षा सरपे, प्रेम कोडापे यांच्यासह तलाठी चंदनखेडे, ग्रामसेवक बारशिंगे, महसूल सेवक माणिक कोडापे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. किरसान यांनी या ऐतिहासिक मंदिराचे जीर्णोद्धार काम लवकरात लवकर पूर्ण होऊन भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी यापूर्वी संसदेतही मागणी केली असून, यापुढेही आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button