
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद ; संशोधकांना नवा दृष्टिकोन देण्याचे आवाहन
गडचिरोली : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि परकीय आक्रमणांविरुद्धचा लढा सर्वप्रथम आदिवासी समाजाने सुरू केला, असा गौरवशाली इतिहास सांगत ‘जनजातीय इतिहास हा भारतीय इतिहासाचा अविभाज्य भाग आहे’, असे मत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, दिल्लीचे युवा प्रमुख वैभव सुरंगे यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठात इंग्रजी विभाग व आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे आयोजित ‘भारतीय इतिहास लेखन: मध्य प्रांतातील जनजातीय योगदान’ या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, पद्मश्री जागेश्वर यादव, रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. शाम कोरेटी, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते.
सुरंगे यांनी बिरसा मुंडा यांना जनजातीय समाजातील गौरवाचे प्रतीक म्हणून संबोधले. ते म्हणाले की, परकीय आक्रमणांविरुद्ध सर्वप्रथम लढणारे आदिवासीच होते. त्यांनी राणी दुर्गावती, तिलका मांझी, वीर बाबुराव शेडमाके आणि बिरसा मुंडा यांसारख्या जननायकांचा उल्लेख करून त्यांच्या सामूहिक नेतृत्वाखालील लढ्यांचे महत्त्व सांगितले. अनेक संशोधकांनी आदिवासी समाजाबाबत चुकीच्या संकल्पना मांडल्यामुळे त्यांच्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे, त्यामुळे आता वास्तववादी दृष्टिकोनातून इतिहास लिहिण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरंगे म्हणाले की, भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, या प्रक्रियेत जनजातीय समाजाचे योगदान निर्णायक ठरेल. त्यामुळे विद्यापीठांनी या इतिहासाचे नव्याने संशोधन करून लेखन करण्याची गरज आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर देशात निराशा असतानाही आदिवासी समाज लढत होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विशेष अतिथी म्हणून बोलताना पद्मश्री जागेश्वर यादव यांनी बीरहोर आदिवासींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा अनुभव सांगितला. बीरहोर भाषा, पारंपारिक संकल्पना संदर्भातील माहिती व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासंदर्भात केलेले कार्य, छात्रावास व कोविड मध्ये टीकाकरण मधील योगदान व जनजातीमध्ये झालेला अमुलाग्र व स्थाई, शिक्षण व स्वास्थ या त्री सूत्रीवर काम करून बीरहोर जनजातीला स्थाई करण्यात केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष अनुभव कथन केले. परिसंवादाच्या अंतिम सत्रात डॉ. शाम कोरेटी यांनी गोंड राज्यांचा इतिहास आणि मुरीया विद्रोहावर प्रकाश टाकत, हा इतिहास समाजासाठी स्वाभिमान जागृत करणारा आहे असे मत व्यक्त केले. या परिसंवादामध्ये छत्तीसगढ, ओडीसा आणि महाराष्ट्रातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



