गडचिरोलीनागपूरविदर्भ

शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

गडचिरोली : नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे. या शिक्षक पदभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने अखेर विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्यानंतर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘एसआयटी’ नियुक्तीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

नागपूर विभागातून उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची पाळेमुळे नागपूर, भंडारा, नाशिक आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पसरली आहेत. बोगस भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात अराजकता माजल्याची तक्रार आमदार अडबाले यांनी केली होती. या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधून त्यांनी निवृत्त अधिकारी आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली राज्यस्तरीय एसआयटी नेमण्याची मागणी केली होती.

यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तरात नागपूर, भंडारा, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार असून, यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री भोयर सांगितले होते.

शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानुसार, सरकारने ७ ऑगस्ट रोजी ‘एसआयटी’ची घोषणा केली. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (पथक प्रमुख), पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा व शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) हारून आतार यांचा या ‘एसआयटी’मध्ये समावेश आहे.

या पथकाला २०१२ पासूनच्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून, चौकशी पथक गठित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार अडबाले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे यश मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button