गोंदियाविदर्भ

सिंधी समाजाच्या कायमस्वरुपी पट्ट्यांचा मार्ग मोकळा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

गोंदिया : सिंधी समाज बांधवांच्या दीर्घकालीन मागण्यांपैकी पट्टे वाटपाची समस्या शासनाने मार्गी लावली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आलेला आहे. लवकरच पात्र नागरिकांना पट्टे वाटप केले जाणार आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

गृहनिर्माण राज्यमंत्री गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर आले असतांना त्यांनी (ता.11) येथील शंकर चौक, सिंधी कॉलनी, गोंदिया येथे सिंधी समाजातील प्रतिनिधींसोबत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार डॉ. परिणय फुके, सीता रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये निर्भया पथक व दामिनी पथक अधिक सक्रीय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधी समाजाला न्याय मिळवून देण्यास त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, सिंधी समाजाच्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. शासन निर्णयानुसार लवकरच सिंधी समाजाला मालकी हक्काबाबत पट्टे देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील सिंधी समाजातील समस्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी शासन स्तरावर एक बैठक लावण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु नोतानी यांनी केले. सुत्रसंचालन किशोर तलरेजा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गुड्डू चांदवानी यांनी मानले. कार्यक्रमास सिंधी पंचायत पदाधिकारी, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button