‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत आदर्श महाविद्यालयात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आणि अनेक रोपे लावली.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम खंडारे यांनी झाडांचे महत्त्व स्पष्ट केले. “झाड हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. त्यातून आपल्याला शुद्ध हवा आणि जीवन मिळते. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावून त्याची काळजी घेतली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. वृक्षारोपणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच, आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर आणि देश सुंदर बनवण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. मनिषा पिपरे, प्रा. सुदर्शन जानकी, प्रा. प्रणिता चंदनखेडे, प्रा. अजय राठोड, नितीन चौधरी, प्रा. ऋतिक कोहळे, प्रा. मंगेश कडते, प्रा. पंकज राऊत, प्रा. मनोज बिरहारी तसेच विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली आहे.



