गडचिरोलीविदर्भ

स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवावे- आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

गडचिरोली सैनिकी विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला आदराने वंदन केले.

आमदार आत्राम यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. ते म्हणाले, “त्यांनी केलेल्या त्यागाचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. त्यांचे स्मरण केवळ १५ ऑगस्टपुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या आदर्शांचे अनुकरण रोजच्या जीवनात करणे गरजेचे आहे.” स्वातंत्र्यानंतर अनेक आव्हाने असूनही आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि शेतीसह अनेक क्षेत्रांत जागतिक स्तरावर प्रगती करत आहे, याचे श्रेय स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी युवा पिढीला राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. शिक्षण, संस्कार आणि मेहनत हे देखील देशप्रेमाचाच एक भाग आहेत, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, डॉ. अविनाश शंखदरबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रा. रिंकू पापडकर, प्रभारी प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, ध्वजारोहणानंतर वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.

शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील ‘बेस्ट हाऊस’, उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. आमदार आत्राम यांनी विद्यालयाच्या शिस्तीचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भविष्यात देशाचे रक्षक बनण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राकेश चडगुलवार यांनी केले. तर आभार संतोष कुलमेथे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button