आरोग्यमहाराष्ट्रमुंबई

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ७ लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

१६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अनोखा उपक्रम

मुंबई : गणेशोत्सवासारख्या लोकशाही सणाला सामाजिक कार्याची जोड देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभिनव उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या या अभियानात ७ लाखांहून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तर १६,७९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळाला. एकूण आरोग्य शिबिरे: १२,६५५, तपासणी केलेले रुग्ण: ७,०४,०७३, पुरुष लाभार्थी: ३,१३,५०८, महिला लाभार्थी: ३,०५,०३४, बाल लाभार्थी: ८५,५०८, पुढील उपचारांसाठी पाठवलेले रुग्ण: १८,८००, एकूण रक्तदान शिबिरे: २३६, एकूण रक्तदाते: १६,७९८

या अभियानात पुणे जिल्ह्याने सर्वाधिक शिबिरे (२,५२५), सर्वाधिक रुग्ण तपासणी (१,६५,७१८) आणि बालकांचा सर्वाधिक सहभाग (२०,७८१) नोंदवला. तर कोल्हापूर जिल्ह्याने सर्वाधिक रक्तसंकलन (४,५०४ युनिट्स) करून या उपक्रमात मोठे योगदान दिले. या उपक्रमाला राज्यातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. यामुळे हा लोकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावी ठरला. या अभियानात महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, ‘या तपासणी शिबिरातून आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जातील.’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा ‘श्रीगणेशा’ करण्याची ही कल्पना महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button