
रोजगार आणि शेती विकासासाठी ‘आप‘ कटिबद्ध ; जॉब कार्डसाठी अर्ज भरणे सुरू
कुरखेडा : गेल्या ११ वर्षांपासून कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रात बंद असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) पुन्हा सुरू करण्यासाठी आम आदमी पार्टी (आप), गडचिरोलीने जोरदार पाऊल उचलले आहे. १४ सप्टेंबर रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली किसान मंगल कार्यालय येथे रोहयो मजुरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मजुरांनी योजनेअंतर्गत काम मिळवण्यासाठी आवश्यक अर्ज भरले, ज्यामुळे मनरेगा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुरखेडा नगर पंचायत स्थापन झाल्यापासून मनरेगाची कामे पूर्णपणे थांबली आहेत. शासन निर्णय (३ मार्च २०१४ आणि १८ नोव्हेंबर २०२१) नुसार, नगर पंचायत क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे, ज्यासाठी राज्याकडून १०० टक्के निधी उपलब्ध होतो. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मजुरांना स्थानिक रोजगार मिळत नाही, तर शेतकऱ्यांना शेततळे, विहिरी आणि जलस्रोत पुनरुज्जीवनासारख्या कामांपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे मजुरांचे शहरांकडे स्थलांतर वाढले असून, ग्रामीण भागाचा विकास थांबला आहे.
या बैठकीत योजनेची त्वरित अंमलबजावणी: मनरेगाची कामे तातडीने सुरू करावी. रोजगार निर्मिती: सर्व जॉब कार्ड धारकांना किमान १०० दिवसांचा रोजगार द्यावा. शेती विकास: शेततळे, विहिरी आणि पाणदण रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे. मजुरी वितरण: थकित मजुरी तात्काळ अदा करावी आणि १५ दिवसांत बँक खात्यात जमा करावी. पारदर्शकता: सामाजिक अंकेक्षण (social audit) आणि तक्रार निवारण यंत्रणा (grievance redressal mechanism) स्थापन करावी. या प्रमुख मागण्या ‘आप’ने मांडल्या.
बैठकीला जिल्हा सचिव अमृत मेहेर, उपाध्यक्ष राजू मडावी, संघटक ताहिर शेख, सहसंघटक चेतन गहाणे, कोषाध्यक्ष इरफान पठाण, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि मोठ्या संख्येने मजूर उपस्थित होते. मजुरांनी एकजुटीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
नसीर हाशमी म्हणाले, “कुरखेड्यातील शेतकरी आणि मजुरांवरील ११ वर्षांचा अन्याय दूर करण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे. MGNREGA ची अंमलबजावणी ही आर्थिक स्थैर्यासाठी गरजेची आहे.” राजू मडावी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रणासाठी शेती सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. ताहिर शेख आणि चेतन गहाणे यांनी मजुरांना एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘आप’ने कुरखेडा नगर पंचायत प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली असून, जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या प्रयत्नांमुळे कुरखेड्यात रोजगार निर्मिती, शेती विकास आणि ग्रामीण समृद्धीला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.



