गोंदियाविदर्भ

के.टी.एस. रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा

‘Don’t Miss a Beat’ संकल्पनेसह जनजागृती ; आरोग्य अधिकाऱ्यांकडून संतुलित आहार आणि व्यायामाचा सल्ला

गोंदिया : जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या हृदयविकारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून गोंदिया येथील के.टी.एस. सामान्य रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर्स उपस्थित होते. डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, २०२५ च्या जागतिक हृदय दिवसाची संकल्पना “डोन्ट मिस ए बीट” (Don’t Miss a Beat) ही आहे. ही संकल्पना हृदयाच्या प्रत्येक ठोक्याचे महत्त्व सांगते आणि हृदयविकारांना प्रतिबंध करण्यासाठी त्वरित लक्ष देण्याचे आवाहन करते. डॉ. अभिजीत गोल्हार यांनी हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य पावले उचलण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

उपस्थित डॉक्टरांनी हृदयविकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. तृप्ती कटरे यांनी हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली. डॉ. पोषण बिसेन यांनी आहाराबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने, फळे आणि भाज्यांनी युक्त आहार हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्याचबरोबर, फॅटी खाद्यपदार्थ आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. डॉ. अनिल आटे यांनी तंबाखू आणि धूम्रपानाचा हृदयरोगावर होणारा गंभीर परिणाम स्पष्ट केला. धूम्रपान सोडल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो, तसेच निष्क्रिय धुराचा (Passive Smoke) संपर्कही टाळणे महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्यासह आरोग्य पथकाने सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button