
शोदेपूर येथील २५ वर्षीय तरुणाचा रहस्यमय मृत्यू; पोलीस तपास सुरू
भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शोदेपूर गावाजवळील जंगल परिसरातील तलावात शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख पटली असून, तो शोदेपूर येथील रहिवासी शामलाल मानू मरस्कोले (वय २५) आहे.
शामलाल मरस्कोले हा २ ऑक्टोबरपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता होता. गुरुवारी (३ ऑक्टोबर) संध्याकाळी ग्रामस्थांना तलावाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र अंधारामुळे शोध थांबवण्यात आला. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध घेत असताना, त्याचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार खोब्रागडे घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच शामलालच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, तलावात त्याचा मृत्यू कशामुळे झाला, या प्रश्नाचा पोलीस शोध घेत आहेत.



