
गडचिरोली : ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने ‘विकास कट्टा-संवाद सरपंचाशी’ हा अभिनव उपक्रम दर सोमवारी राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींना सक्षम व समृद्ध बनवण्यासाठी थेट मार्गदर्शन केले जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींची निवड केली जाते आणि त्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी सीईओ गाडे थेट संवाद साधतात.
या संवादात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’मधील सुशासनयुक्त पंचायत राज: लोकाभिमुख आणि सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे. सक्षम पंचायत: स्वनिधी, CSR आणि लोकवर्गणीतून आर्थिक दृष्ट्या संस्थांना बळकट करणे. जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण (Convergence) करणे. लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे. उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय. या प्रमुख घटकांवर मार्गदर्शन केले जाते.
सीईओ गाडे यांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या कामांचा सखोल आढावा घेतला. यामध्ये कर वसुली, श्रमदानाचा दिवस निश्चित करून श्रमदानातून स्वच्छता, रस्ते, नाली बांधकाम, वाचनालय, व्यायामशाळा, शाळा मैदान तयार करणे आणि शाळा रंगरंगोटी यांसारख्या कामांवर भर देण्यास सांगितले. याव्यतिरिक्त, सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, १००% पाणीपुरवठा करणे, घरांवर सोलर बसवणे, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, बचत गटांना प्रोत्साहन, आरोग्य तपासणी, ॲनिमिया मुक्त ग्रामपंचायत करणे, आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प आणि अपंगांना UDID कार्ड काढून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
संकल्पनेचा उद्देश हा आहे की, प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन संकल्पनांची माहिती मिळावी आणि यशस्वी संकल्पनांची माहिती इतर ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचावी. तसेच, अभियानात अधिकाधिक गुण मिळवून ग्रामपंचायती समृद्ध व सक्षम कशा बनतील, यावर मार्गदर्शन केले जाते.
सीईओ सुहास गाडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना या महत्त्वाकांक्षी अभियानात सहभागी होऊन विभाग व राज्यस्तरीय बक्षिसे जिंकण्याचे आवाहन केले. या अभियानात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर कोट्यवधी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाने केली आहे:
ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक 15 लक्ष रुपये, द्वितीय 12 लक्ष, तृतीय 8 लक्ष व दोन विशेष पुरस्कार 2 ग्रामपंचायतला 5 लक्ष, जिल्हा स्तरावर प्रथम 50, द्वितीय 30, तृतीय 20, विभाग स्तरीय प्रथम पुरस्कार 1 कोटी, द्वितीय 80 लक्ष, तृतीय 60, राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी तसेच पंचायत समितीसाठी बहुस्तरीय पुरस्कार विभाग स्तरीय प्रथम 1 कोटी, द्वितीय 75 लक्ष, तृतीय 60 लक्ष, राज्य स्तरीय पुरस्कार प्रथम 2 कोटी, द्वितीय 1.5 कोटी, तृतीय 1.25 कोटी,जिल्हा परिषद राज्य स्तरीय पुरस्कार प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी अश्याप्रकारे पुरस्काराची रक्कम राज्य शासनाकडून ठेवण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी जास्तीत जास्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) पंकज भोयर, जिल्हा व्यवस्थापक आकाश चापले (राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान), सर्व गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.



