गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल ; गुन्हे तपासाला मिळणार वैज्ञानिक बळकटी!

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते व्हॅनचे अनावरण

गडचिरोली : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ या नव्या कायद्यानुसार, ७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्याय वैद्यकीय पुराव्यांचा (Forensic Evidence) वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी, गडचिरोली जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ची (Mobile Forensic Van) उपलब्धता करण्यात आली आहे.

मा. महासंचालक (न्याय व तांत्रिक) यांच्या धोरणानुसार उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक व्हॅनचे अनावरण ०७ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. नजीकच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागासाठी अशी व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’मुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. व्हॅनमध्ये बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे शक्य होईल. त्वरित अहवाल तयार करता येणार असल्याने तपास प्रक्रियेत वेळेची मोठी बचत होईल. वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येईल.

या एकत्र प्रणालीमध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेषत: सायबर गुन्हे, हत्या, अपघात आणि अन्य गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ही ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ नियंत्रण कक्ष तत्काळ फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करेल. फॉरेन्सिक तज्ज्ञ छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून गुन्ह्याचे दस्तऐवजीकरण करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून तो तत्काळ पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले की, “फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. ही व्हॅन तपास कार्यक्षमतेत वाढ करेल आणि गुन्ह्यांचा उलगडा करण्यात महत्त्वाचे फॉरेन्सिक सहाय्य पुरवेल.”

या अनावरणप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक (अहेरी), अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. (प्रशासन) यांची उपस्थिती होती. स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि. नेहा हांडे तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button