
अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली गावाला दारूविक्रीच्या जाळ्यातून मुक्त करण्याचा निर्धार मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली महिलांसह युवकांनी केला आहे. मागील आठ दिवसात ५ विक्रेत्यांकडून दारु जप्त करून प्रत्येकी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. सोबतच ४ जणांवर अहेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी झाले आहे.
नागेपल्ली हे अहेरी तालुक्यातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जाते. या गावात सुरु असलेला अवैध दारूविक्रीचा व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी गावातील महिलांसह युवकांनी पुढाकार घेतला आहे. गावातील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सभेत अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित झाल्यापासून मुक्तिपथच्या मार्गदर्शनात मुक्तिपथ गाव संघटना व युवक संघटना सक्रिय झाली आहे. विक्रेत्यांविरोधात विविध निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरु केली आहे. गावातून रॅली काढून जागृती करणे, अहिंसक कृतीतून विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी विविध उपक्रम राबवून दारूविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी मुक्तिपथचे नंदिनी आशा स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत.
मागील आठ दिवसापासून अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु आहे. या मोहिमेत ५० ते ६० महिलांसह ३० युवक-युवतींचा सहभाग असून आपल्या गावाला पूर्णपणे अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत अहिंसक कृतीच्या माध्यमातून हजारो रुपये किमतीची दारू जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केली असून ४ दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ग्रामसभेच्या ठरावानुसार ५ दारू विक्रेत्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे दंड देखील वसूल करण्यात आला आहे. महिलांच्या प्रयत्नातून गावात दारूविक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. काही विक्रेत्यांनी अवैध व्यवसाय बंद केल्याचे दिसून येते. जो पर्यंत आपले गाव दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही लढणार असा मानस महिलांनी व्यक्त केला आहे.



