
पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी जाळली ; ६ आरोपींना अटक
चंद्रपूर: दिवाळीचे गिफ्ट न दिल्याच्या किरकोळ वादातून चंद्रपूर शहरात सहा जणांनी मिळून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका तासात छडा लावत सर्व सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नितेश वासुदेव ठाकरे (वय २७, रा. दुर्गापूर) असे मृतकाचे नाव आहे. नितेश हा दुर्गापूर येथील सुजित जयकुमार गणवीर याच्या पानटपरीवर काही महिन्यांपासून काम करत होता. दिवाळी असल्याने नितेशला मालक सुजितकडून नवीन कपडे किंवा ‘गिफ्ट’ मिळण्याची अपेक्षा होती, मात्र सुजितने गिफ्ट दिले नाही. यावरून झालेल्या वादानंतर नितेशने कामावर जाणे बंद केले. यामुळे सुजितच्या मनात नितेशविरुद्ध राग होता. रागाच्या भरात सुजितने ऑनलाइन चाकू मागवला आणि नितेशला मारण्याचा कट रचला. बुधवारी, सुजितने आपल्या पाच मित्रांसोबत नितेशला “चित्रपट पाहायला जाऊ या” या बहाण्याने बाहेर घेऊन गेला. रात्री सर्वांनी मद्यपान केले आणि तुकूमकडील लॉ कॉलेजच्या मागील निर्जनस्थळी त्याला घेऊन गेले. तिथे आरोपींनी नितेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी नितेशची दुचाकी पद्मापूर परिसरातील नीला पाणी नाल्याजवळ नेऊन पेटवून दिली. गुरुवारी सकाळी लॉ कॉलेज परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासानंतर तो मृतदेह नितेश ठाकरे याचा असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित तपासाची चक्रे फिरवत करण गोपाल मेश्राम, यश छोटेलाल राऊत, अनिल रामेश्वर बोंडे, प्रतीक माणिक मेश्राम, तौसीफ अजीज शेख आणि मुख्य आरोपी सुजित जयकुमार गणवीर यांना अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात केली.



