
गोंदिया : गोरेगाव तहसील कार्यालयांतर्गत पडीक जमिनीच्या अकृषक परवानगीसाठी १५ हजार लाचेची मागणी केल्या प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी अरविंद कुमार (४३) युवराज डहाट यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी कारवाई करीत मंगळवारी (दि. ४) रात्री गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार ३६ वर्षे, रा. गोरेगाव यांनी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, गट क्र. १००४/४ मधील ३०५.५० चौ.मी. जागेच्या अकृषक विकास परवानगीसाठी मौका चौकशी करून अहवाल तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी आरोपीने १५ हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १४ हजार देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. सापळ्याच्या वेळी आरोपी ग्राम महसूल अधिकारी याने ‘बाबा को लेके आता हूँ’ असे म्हणत जागेवरून निघून गेला. कार्यालयात परत हजर झाला नाही. त्यामुळे त्या दिवशी सापळा यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने विभागास कळवले की आरोपी अधिकाऱ्यास संशय आल्यामुळे तो तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यास तयार नाही व कार्यालयात हजर राहत नाही. त्यावर पुढील कायदेशीर कारवाई हाती घेण्यात आली.
आरोपीची कारवाईदरम्यान अंगझडती घेण्यात आली ज्यात मोबाइल किंमत ५ हजार तपासणीसाठी जप्त करण्याची तजवीज करण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची कार्यवाही सुरू असून याबाबत स्वतंत्र अहवाल सादर होणार आहे. या प्रकरणात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे पोलिस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहाळकर, अशोक कापसे, संतोष बोपचे, संतोष शेंडे, दीपक भाटबर्वे, पोलिस नाईक संगीता पटले, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, रोहिणी डांगे यांनी केली आहे. तपास पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.



