
चामोर्शी तालुक्यातील माडेमुधोली येथील घटना ; आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी
घोट: शासनाने गांजाची लागवड व विक्रीवर कडक प्रतिबंध घातला असतानाही, आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला घोट पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १८ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. रावजी कान्हू हिचामी (वय ५८, रा. माडेमुधोली, ता. चामोर्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रावजी हिचामी याने आपल्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती घोट पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून घोट पोलिसांनी त्वरित हिचामी याच्या शेतात धाड टाकली. यावेळी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची ओली झाडे आढळून आली. पोलिसांनी शेतातून ३७ किलो वजनाची ओली गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे प्रती किलो ५० हजार रुपये यानुसार एकूण किंमत १८ लाख ५६ हजार ६०० रुपये इतकी आहे.
आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घोट पोलीस मदत केंद्रात सरकारतर्फे तक्रार दाखल केली. पोलिसांनी रावजी हिचामी याला ५ नोव्हेंबर रोजी अटक केली. आरोपीला चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जया शेळके करीत आहेत.



