
जीव वाचवण्यासाठी कुटुंबाची धावपळ ; रोख ४० हजार रुपये आणि दागिने जळून खाक
गडचिरोली : शहरातील गोकुळनगर परिसरातील नगरपरिषदेच्या सावित्रीबाई फुले शाळेसमोर शनिवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडल्याने संपूर्ण गडचिरोली शहर हादरले. घरातील फ्रिजमध्ये बिघाड झाल्यानंतर मेकॅनिक येण्यापूर्वीच फ्रिजचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे बाजूला असलेल्या गॅस सिलेंडरनेही पेट घेतला आणि काही क्षणांतच माया सचिन भानारकर यांचे घर पूर्णतः बेचिराख झाले.
१३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भानारकर यांच्या घरातील फ्रिजचा दिवा सतत उघडझाप करत असल्याने तांत्रिक बिघाड असल्याच्या संशयावरून मेकॅनिकला बोलावण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्ती होण्याआधीच फ्रिजचा जोरदार स्फोट झाला आणि घरात आगीने थैमान घातले. स्फोटाचा आवाज होताच घरातील सदस्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तातडीने घराबाहेर धाव घेतली.
फ्रिजच्या स्फोटामुळे जवळच ठेवलेल्या गॅस सिलेंडरला आग लागली आणि नंतर सिलेंडरचाही स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली. आगीच्या भडक्यात घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य, कपडे, फर्निचर यांसह छतावरील कवेलू जळून खाक झाले. संपूर्ण घराची राखरांगोळी झाली.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. घरमालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात ठेवलेले ४० हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे भानारकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.
या दुर्घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घरगुती विद्युत उपकरणे व गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



