
झुरकुटोला येथील घटना ; आठ महिन्यांपूर्वीच झाले होते रुजू
गोंदिया : गोंदिया पंचायत समितीअंतर्गत डव्वा केंद्रातील झुरकुटोला येथील एक शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष शिक्षक नितीन गोस्वामी (वय ३८) यांचा शनिवारी (दि. १३) सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास शाळेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत आणि संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
शिक्षक नितीन गोस्वामी हे सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत अध्यापनाचे कार्य करीत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. विद्यार्थ्यांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गोस्वामी यांना उपचारासाठी डव्वा येथील डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या दुःखद बातमीने शाळेत आणि झुरकुटोला गावात शोककळा पसरली.
शिक्षक नितीन गोस्वामी हे अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच आंतरजिल्हा बदलीने झुरकुटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू झाले होते. रुजू झाल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले होते. “असे शिक्षक यापूर्वी आमच्या गावात आलेच नाहीत,” अशा शब्दांत गावकऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक कर्तव्यदक्ष शिक्षक गमावला आहे.



