भंडाराविदर्भ

अल्पसंख्याक नागरिक देशाचे अविभाज्य घटक, समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी सावनकुमार

भंडाऱ्यात ‘अल्पसंख्याक हक्क दिवस‘ साजरा ; विविध समाज प्रतिनिधींचा सहभाग

भंडारा : “भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक समाज हा या देशाचा सन्माननीय नागरिक आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला होता, त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी पुढे नमूद केले की, “अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरा जतन व संवर्धन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हाच या दिनाचा मुख्य उद्देश आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिट्टे यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समुदायातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मुफ्ती मो. साजिद (अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, भंडारा) यांनी अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या गरजेवर भर दिला आणि प्रशासनाकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या. किशोर नामदेव बौद्ध (जिल्हाध्यक्ष, भारतीय पंजीकृत बौद्ध महासभा) यांनी “शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी मांडले. मोहम्मद आरिफ शेख (जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख) यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आणि समाजाची जबाबदारी यावर भाष्य केले.

या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिट्टे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दातीर, महिला बालविकास विभागाचे अधिकारी बांदोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोंगाडे यांनी केले, तर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी  दातीर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button