एशियन युथ पॅरा गेम्समध्ये श्वेता कोवेला सुवर्ण व कांस्य पदक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

गडचिरोली : दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये जिल्हयातील आष्टी येथील दिव्यांग खेळाडू कु. श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावून नवा इतिहास रचला आहे. तिच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून तिचे विशेष अभिनंदन केले असून, तिच्या जिद्दीला सलाम केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले की, दुर्गम भागातून आलेल्या एका तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर १४ देशांच्या खेळाडूंशी झुंज देत चमकदार कामगिरी करणे, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. श्वेताने केवळ पदक जिंकले नाही, तर आपल्या आत्मविश्वासाने आणि अथक परिश्रमाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. श्वेताचे यश हे गडचिरोलीतील आणि राज्यातील असंख्य मुला-मुलींसाठी नवी उमेद देणारे आणि प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले.
श्वेताचा हा विजय केवळ खेळातील नसून तिच्या आयुष्यातील संघर्षाचाही विजय आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी श्वेताच्या आईवर आली. श्वेताच्या आईने मोलमजुरी करून घराचा गाडा हाकला आणि श्वेताच्या स्वप्नांना कधीही तडा जाऊ दिला नाही. शारीरिक मर्यादा आणि आर्थिक अडचणींवर मात करत श्वेताने तिरंदाजीचा सराव सुरू ठेवला, ज्याचे फळ आज सुवर्णपदकाच्या रूपाने देशाला मिळाले आहे.
तब्बल १४ देशांच्या कसलेल्या खेळाडूंना मागे सारत श्वेताने हे यश मिळवले आहे. आता तिचे स्वप्न भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे आहे. तिच्या या यशाने गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील क्रीडा गुणवत्तेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू आणि विविध संघटनांकडून श्वेतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



