गडचिरोलीविदर्भ

चिचोली गावाची व्यसनमुक्तीकडे यशस्वी वाटचाल ; चार वर्षांपासून अवैध दारू हद्दपार

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या चिचोली या गावाने एकजूट आणि निर्धाराच्या जोरावर ‘अवैध दारूमुक्त गाव’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील चार वर्षांपासून या गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद असून, गावाने आदर्श ग्राम निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

काही वर्षांपूर्वी चिचोली या आदिवासीबहुल गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसला होता. दारूच्या व्यसनामुळे अनेकांनी शिक्षण सोडले होते, तर घरोघरी होणाऱ्या भांडणांमुळे महिलावर्ग प्रचंड त्रस्त होता. शेती आणि घरकाम करूनही घरात शांतता नसल्याने गावात अस्वस्थता होती. गावाची ही दयनीय अवस्था बदलण्यासाठी ‘मुक्तिपथ’ टीमने पुढाकार घेतला. त्यांनी गावाला भेट दिली असता महिलांनी आपली व्यथा मांडली. मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गावात जागृती करण्यात आली आणि त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभा घेतली. या सभेत सर्वानुमते गावात दारूविक्री बंद करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.

केवळ निर्णय घेऊन ग्रामस्थ थांबले नाहीत, तर त्यांनी त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गावात दारू गाळणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्यावर कठोर दंड आकारण्याचे ठरले. दारू पिऊन तंटे करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली. महिलांनी गावात दारूबंदीसाठी पोषक वातावरण टिकवून ठेवले, ज्यामुळे विक्रेत्यांनी स्वतःहून हा अवैध व्यवसाय बंद केला. दारू विक्री बंदीमुळे गेल्या चार वर्षांत गावातील चित्र पूर्णपणे बदलले आहे. भांडण-तंटे कमी होऊन शांतता प्रस्थापित झाली असून, कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावात पुन्हा हा अवैध व्यवसाय शिरकाव करू नये, यासाठी ‘गाव संघटन’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्याचा निर्धार चिचोलीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. “महिलांची शक्ती आणि ग्रामसभेचा निर्धार एकत्र आल्यास गाव कसे बदलू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिचोली गाव होय.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button