गोंदियाविदर्भ

नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात मोफत फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबिर ; असंसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या नियंत्रणासाठी व्यायामाचे महत्त्व; तज्ज्ञांकडून रुग्णांना थेट मार्गदर्शन

गोंदिया : आजच्या धावपळीच्या युगात मानवी शरीराला ग्रासणाऱ्या असंसर्गजन्य आजारांविरुद्ध (NCD) लढण्यासाठी गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत ‘फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी’ शिबिरांचे सत्र सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून नुकतेच नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (OPD) पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. कांचन भोयर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष नाईक यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले. यावेळी केवळ तपासणीच नाही, तर रुग्णांना दररोजच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या व्यायामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “नुसते आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा, ते होऊच नयेत म्हणून सक्रिय पावले उचलणे गरजेचे आहे. शाळांपासूनच मुलांमध्ये व्यायामाचे महत्त्व आणि फिजिओथेरपीविषयी जागरूकता वाढवणे हे आमचे ध्येय आहे.”

वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष नाईक यांनी नमूद केले की, आजकाल मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता आणि सांधेदुखी (ऑस्टिओआर्थरायटिस) हे आजार झपाट्याने वाढत आहेत. या आजारांवर केवळ औषधांनी नियंत्रण मिळवणे कठीण असून, त्याला फिजिओथेरपी आणि नियमित व्यायामाची जोड देणे अनिवार्य आहे.

फिजिओथेरपीचे प्रमुख फायदे: हृदयविकार व स्ट्रोक: हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी (Cardiac Rehab) विशेष व्यायाम पद्धती वरदान ठरतात. मधुमेह व लठ्ठपणा: विशिष्ट व्यायामामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. सांधेदुखी: स्नायूंची कमकुवतपणा आणि सांधेदुखी कमी होऊन रुग्णाचे जीवनमान सुधारते.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले. रुग्णांची रक्तदाब पातळी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी डॉ. लोथे, क्ष-किरण तंत्रज्ञ सुरज राखुंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जया मेश्राम, फार्मासिस्ट राहुल गवळी, स्टाफ ब्रदर गिरीष आरसोडे आणि कीर्ती रहिले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

“जर आपल्याला असंसर्गजन्य आजारांचा विळखा तोडायचा असेल, तर औषधोपचाराच्या जोडीने फिजिओथेरपीला उपचाराचा महत्त्वाचा भाग मानावा लागेल. आजच शरीरासाठी वेळ द्या, कारण चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” असे आवाहन भौतिक उपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी समारोपप्रसंगी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button