गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

एसआरपीएफ शिपाई पदासाठी ६ हजारांवर उमेदवार

मैदानी चाचणी सुरु ; दोन दिवसात १६०० उमेदवारांनी दिली चाचणी

देसाईगंज : तालुक्यातील विसोरास्थित राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३ च्या सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी १९ जूनपासून शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात झाली आहे. एकूण १८९ जागांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये राज्यभरातील ६ हजार ४९० पुरुष उमेदवार धावणार आहेत. येथे दररोज ८०० उमेदवारांची मैदानी चाचणी २७ जूनपर्यंत घेतली जाणार आहे. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत १ हजार ६०० उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई भरती सन २०२२-२०२३ राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३ विसोरासाठी १८९ पदासाठी भरती कार्यक्रम राबविला जात आहे.

भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत ५ किलोमीटर व १०० मीटर धावणे आणि गोळाफेक यांचा समावेश असतो. पावसाचे दिवस लक्षात घेता १०० मीटर रनिंग ट्रॅक मैदानाच्या जमिनीहून उंच असून जेणेकरून पावसाचे पाणी साचणार नाही. १८९ पदांसाठी एकूण ६९४० अर्ज प्राप्त झाले असून एका पदाला ३६ उमेदवार स्पर्धेत उतरले.

शारीरिक चाचणी आटोपल्यावर मेरिटनुसार निवडक उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरतील. त्यानंतर विसोरा येथीलच शाळांमध्ये या भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विसोराच्या एसआरपीएफ मैदानावर सुरू झालेल्या आणि पुढे ८ दिवस चालणाऱ्या पोलिस भरतीच्या मैदानी शारीरिक चाचणीचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कापलेल्या अंतराची अचूक अशी नोंद घेण्यासाठी मायक्रो चिप वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डी. यू. पवार यांनी दिली. भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी समादेशक विवेक मासाळ, ३ सहायक समादेशक तसेच ७ पोलिस निरीक्षक, २५ अधिकारी व १७५ अंमलदार सहकार्य करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button