
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण ; पालडोंगरी ग्रामपंचायतीला ‘स्वच्छता अभियानात’ ६ लाखांचे प्रथम पारितोषिक
भंडारा : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वीणाताई बडगे (गौरक्षण सेवा संस्था, गराडा) यांना ‘महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजने’अंतर्गत गौरविण्यात आले.
स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींची बाजी
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांची बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले:* प्रथम पुरस्कार: ग्रामपंचायत पालडोंगरी (रु. ६,००,०००/-), द्वितीय पुरस्कार: ग्रामपंचायत आमगाव (रु. ४,००,०००/-), तृतीय पुरस्कार: ग्रामपंचायत माडगी व खराशी (विभागून रु. ३,००,०००/-). याशिवाय, विशेष श्रेणीमध्ये स्व. वसंतराव नाईक पुरस्कार: ग्रामपंचायत निलज (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन – रु. ५०,०००/-), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार: ग्रामपंचायत सिरेगावटोला (पाणी गुणवत्ता व्यवस्थापन – रु. ५०,०००/-), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार: ग्रामपंचायत बोरगाव खुर्द (शौचालय व्यवस्थापन – रु. ५०,०००/-) या ग्रामपंचायतींचा सन्मान झाला.
क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातील मानकरी
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सिहोरा येथील कुमारी सानवी महाजन (राज्यस्तरीय बॉक्सिंग सुवर्णपदक विजेती) हिचा विशेष सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून हजारो रक्तदाते तयार करणारे ‘शतकवीर’ रक्तदाता रक्तरत्न प्रितमकुमार राजाभोज (इंडियन रेड क्रॉस सोसायटी) यांनाही सन्मानित करण्यात आले.
शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदान
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मोहाडी येथील प्राथमिक शिक्षक सतिश विधालोरे आणि साकोली येथील मुख्याध्यापक धर्मेंद्र लक्ष्मणराव कोचे यांना राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल गौरविण्यात आले. पर्यावरणासाठी निरंतर कार्य करणारे रवी भोंगाने (साकोली) आणि दिव्यांग व गरिबांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अशोक कला जयलाल चौधरी (तुमसर) यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सन्मान केवळ व्यक्तींचा नसून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याचा आणि लोकसेवेचा गौरव आहे, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. या सोहळ्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सामाजिक आणि शासकीय स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



