गडचिरोलीविदर्भ

फोकुर्डीचा एल्गार : १०-१२ विक्रेत्यांच्या तावडीतून गाव मुक्त, दीड वर्षांपासून दारू विक्रीबंदी कायम

गडचिरोली : एकेकाळी अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी गावाने आता ‘दारूविक्रीमुक्त गाव’ म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. महिला शक्ती, ग्रामपंचायत आणि ‘मुक्तिपथ’च्या एकत्रित लढ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून गावात थेंबभरही दारू विकली जात नाहीये.

तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या या गावात १० ते १२ विक्रेते उघडपणे दारू विकत होते. यामुळे गावातील शांतता धोक्यात आली होती आणि आर्थिक तसेच आरोग्यविषयक समस्यांनी उग्र रूप धारण केले होते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘मुक्तिपथ’चे संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम, विनोद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी कंबर कसली. यासाठी ग्रामसभा आयोजित करून दाविक्रीरूबंदीचा अधिकृत ठराव पारित करण्यात आला. सर्व विक्रेत्यांना लेखी नोटीस बजावून विक्री बंद करण्याचे आवाहन केले. तरीसुद्धा नोटिशीकडे दुर्लक्ष करून अवैध दारूविक्री सुरूच ठेवली होती.

दरम्यान, नियमाचे उल्लंघन करून गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करणाऱ्या ५ प्रमुख विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करण्यात आली. एवढेच नाही तर पोलीस प्रशासनाच्या मदतीने विक्रेत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. अवैध व्यवसायांविरोधात एक झालेल्या गावकऱ्यांच्या ताकदीपुढे नतमस्तक होत विक्रेत्यांनी अवैध व्यवसाय थांबविले.एकेकाळी अवैध धंद्यांचे केंद्र असलेले हे गाव आज जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे, मागील दीड वर्षांपासून गावात एकही विक्रीचे प्रकरण समोर आलेले नाही. महिलांच्या स्वबळावर आणि सामूहिक प्रयत्नांमुळे गावाने सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला आहे.

“महिलांनी दाखवलेल्या हिमतीमुळेच आज आमचे गाव व्यसनमुक्त झाले आहे. ही बंदी कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ कटिबद्ध आहोत.” – ग्रामस्थ, फोकुर्डी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button