
अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार; कुरखेडा-गेवर्धा मार्गावरील नान्ही फाट्यानजीकची घटना
कुरखेडा : कुरखेडा-गेवर्धा मार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात गेवर्धा येथील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक राजूल्लाह खां पठान (६० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास राजूल्लाह खां पठान हे आपल्या कामावरून परतत असताना नान्ही फाट्यानजीक समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पठान हे रस्त्यावर फेकले गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
रविवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. राजूल्लाह खां पठान हे गेवर्धा परिसरातील परिचित व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघात करून पसार झालेल्या बेजबाबदार वाहनचालकाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कुरखेडा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून पसार वाहनाचा शोध घेतला जात आहे.



