
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ५ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचा आर्थिक चेहरामोहरा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित विदर्भ’ संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ (PRADAN) संस्था यांच्यात ५ वर्षांच्या ‘नीव’ (NEEV) प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार कुटुंबांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि ‘प्रधान’ संस्थेचे कार्यकारी संचालक सरोज महापात्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी डॉ. हर्षा वशिष्ठ, कुंतल मुखर्जी आणि दिगंबर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. टाटा ट्रस्टच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प २०२५ ते २०३० या कालावधीत राबविला जाणार आहे.
हा प्रकल्प केवळ शेतीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा आहे. प्रकल्पांतर्गत खालील बाबींवर विशेष भर दिला जाईल:
- पुनरुत्पादक शेती: हवामान बदलाचा विचार करून शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब.
- जलसंधारण: पाण्याचे योग्य नियोजन आणि जलस्त्रोतांचा विकास.
- उपजीविका: वनआधारित उत्पादने, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायाला चालना.
- महिला सक्षमीकरण: महिलांच्या नेतृत्वाखालील स्थानिक संस्थांना अधिक मजबूत करणे.
- प्रशासकीय बळकटीकरण: ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी करणे.
सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. ‘नीव’ प्रकल्पांतर्गत नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मजबूत पाया (नीव) दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी करून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. पुढील पाच वर्षांत गोंदिया जिल्हा शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.



