गोंदियाविदर्भ

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात आता ‘पॅलिएटीव्ह केअर’ – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार

वेदनामुक्त आयुष्यासाठी आरोग्य विभागाचे मोठे पाऊल! ; प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही मिळणार ‘मॉर्फिन’ सारखी वेदनाशामक औषधे

गोंदिया : कर्करोग, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या आणि वृद्धापकाळातील व्याधींशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात आता ‘पॅलिएटीव्ह केअर’ (पशामक उपचार) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णाला केवळ जगवणे नव्हे, तर त्याला सन्मानाने आणि वेदनामुक्त जीवन जगता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

यापूर्वी गंभीर वेदनाशामक उपचारांसाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता या सेवेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ही सेवा जिल्हा रुग्णालयापासून ते उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत (PHC) उपलब्ध असेल. अत्यंत तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे ‘मॉर्फिन’ सारखे प्रभावी औषध आता थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असेल. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या पायपिटी थांबणार आहेत.

प्रशासनाने या सेवेसाठी कडक नियमावली तयार केली आहे. कोणत्याही रुग्णालयाला आता “उपचार झाले, पण वेदना ही आमची जबाबदारी नाही” असे म्हणून हात झटकता येणार नाही. जिल्हा रुग्णालयांमध्ये या सेवेसाठी ४ ते ६ खाटा कायमस्वरूपी राखीव राहतील. यात केवळ औषधेच नाहीत, तर २४ तास नर्सिंग केअर, फिजिओथेरपी आणि रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन (Counseling) केले जाईल. जे रुग्ण रुग्णालयात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी गरजेनुसार गृहभेटीची सुविधाही दिली जाणार आहे.

पॅलिएटीव्ह केअरबद्दल समाजात असलेला एक मोठा संभ्रम डॉ. गोल्हार यांनी दूर केला. ते म्हणाले, अनेकदा लोकांना वाटते की ही सेवा केवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णांसाठी आहे. मात्र, तसे नसून आजाराचे निदान झाल्यापासून ते उपचारांच्या शेवटपर्यंत रुग्णाला शारीरिक वेदना आणि मानसिक तणावातून मुक्त ठेवणे, हा या वैद्यकीय व्यवस्थेचा गाभा आहे. रुग्ण वाचलाच पाहिजे या संकुचित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन, रुग्णाला सन्मानाने आणि वेदनामुक्त जगता आले पाहिजे, ही शासनाची मोठी हमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button