गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

महावितरणचे ‘आधारस्तंभ’ असलेल्या लाईनमन्सचा गौरव; चंद्रपूर परिमंडळात ‘लाईनमन दिन’ उत्साहात

चंद्रपूर : उन्हाळा असो वा पावसाळा, अहोरात्र संकटांशी झुंज देत जनतेच्या घरात प्रकाश पोहोचविणाऱ्या ‘लाईनमन’ (जनमित्र) या घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण चंद्रपूर परिमंडळात ‘लाईनमन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व २९ उपविभागांमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करत त्यांना वीज सुरक्षेची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाली. मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांनी स्वतः सभागृहाच्या प्रवेशद्वारात उभे राहून प्रत्येक लाईनमनचे पुष्प देऊन स्वागत केले. “समृद्धीचे, विकासाचे, नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हेच ध्येय महावितरणचे” या ब्रीदवाक्याने कार्यक्रमाची गुंफण करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता हरीश गजबे म्हणाले, “चंद्रपूरचे कडक ऊन असो, पुरात पोहून जावे लागणारी परिस्थिती असो किंवा गडचिरोलीसारखा दुर्गम भाग; आमचे जनमित्र ३६५ दिवस अविरत सेवा देतात. तुम्ही महावितरणचे ‘आधारस्तंभ’ आहात, याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र, काम करताना सुरक्षेशी कधीही तडजोड करू नका, कारण तुमची वाट घरी तुमचे कुटुंब पाहत असते.”

अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतानाच, नवीन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच चंद्रपूर मंडळांतर्गत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. यावेळी पुंडलिक वणवे आणि डॉ. अनिष नायर यांनी तांत्रिक कामात घ्यावयाची सुरक्षा आणि खबरदारी यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात केवळ अधिकाऱ्यांनीच नव्हे, तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही आपली मते मांडली. तांत्रिक कर्मचारी विजय इंगोले, सरोजिनी लोखंडे, रोशना कामतवार आणि सुमेध वनकर यांनी आपले अनुभव सांगताना प्रशासनाने घेतलेल्या या दखलीबद्दल समाधान व्यक्त केले.

या सोहळ्याला कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दाव्हेकर, योगेंद्र निचत, विकास शहाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा, कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप वावरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते. चंद्रपूरसह बल्लारशा, वरोरा, गडचिरोली, आलापल्ली आणि ब्रह्मपुरी अशा सर्व प्रमुख केंद्रांवर हा दिवस उत्साहात साजरा झाला, जिथे सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची सामूहिक शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button