गडचिरोलीविदर्भ

विक्रमपूर ग्रामपंचायतीचा अवैध धंद्यांविरुद्ध कडक ‘फर्मान’ ; बॅनरच्या माध्यमातून दिला कडक कारवाईचा इशारा

जयनगर, कृष्णनगर आणि नवग्राममध्ये व्यसनमुक्तीसाठी गाव संघटना सरसावल्या

चामोर्शी : तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक आणि कडक पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये अवैध दारू आणि गांजा विक्री करणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर कारवाई करण्याचा ‘फतवा’ काढण्यात आला असून, यासंदर्भातील जनजागृती बॅनर थेट गावागावांतील मुख्य चौकात झळकले आहेत.

विक्रमपूरसह जयनगर, कृष्णनगर आणि नवग्राम या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीमुळे कौटुंबिक कलह आणि शांततेचा भंग होण्याच्या घटना घडत होत्या. या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना आणि ग्रामपंचायत समितीने कंबर कसली आहे. केवळ सूचना देऊन न थांबता, आता दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवरही प्रशासकीय बडगा उचलला जाणार आहे.

प्रभारी सरपंच यांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबवली जात आहे. गावात कुणीही अंमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. नारायण किरण मंडल (परिचालक, जयनगर) आणि निरापद सुरेन गाईन (परिचालक, विक्रमपूर) यांनी नागरिकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, गावाला ‘व्यसनमुक्त’ करण्यासाठी सहकार्य मागितले आहे.

या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलांनी घेतलेला सक्रिय सहभाग. शक्तीपथ आणि मुक्तीपथ संघटनेच्या महिला पदाधिकारी अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. यामध्ये विश्वास, पौर्णिमा मंडल, अनिमा सरकार, उषा बार, काजल रॉय, रीता मंडल, प्रकाश मंडल आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गावात कोणताही व्यक्ती दारू किंवा गांजा विक्री करताना आढळल्यास, अथवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करताना आढळल्यास त्यांच्यावर  कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अशी सूचना ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे. विक्रमपूर ग्रामपंचायतीच्या या धाडसी निर्णयामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांकडून या ‘कडक फर्मानाचे’ उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button