चंद्रपूरविदर्भ

रेल्वे विकासाची गती वाढवा, प्रवाशांची गैरसोय खपवून घेणार नाही! – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर व बल्लारशाह रेल्वे स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामांबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी

चंद्रपूर : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. काही विकासकामांची गती संथ असल्याचे पाहून त्यांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व प्रलंबित कामे कालबद्ध नियोजनानुसार तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.

पाहणी दरम्यान आ. मुनगंटीवार यांनी स्थानकावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालये, तिकीट खिडक्यांवरील व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये आणि त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी रेल्वेने तांत्रिक सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

या भेटीदरम्यान व्यापारी मंडळ, स्टेशन स्टॉल असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने: बल्लारशाह–कुर्ला रेल्वेगाडी दैनिक करणे. काजीपेठ–पुणे मार्गावरील गाड्या दररोज चालवणे. या मागण्यांची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

स्टेशन परिसरातील व्यापारी आणि चाईल्ड लाईन हेल्प सेंटरच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली. रेल्वे विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे काही कामे रेंगाळली आहेत, असा ठपका ठेवत त्यांनी गुणवत्ता आणि गती यावर कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये रेल्वेचे स्थान महत्त्वाचे आहे. नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, ही माझी प्राथमिकता आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील.”

या बैठकीला आणि पाहणी दौऱ्याला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते यांच्यासह हरीश शर्मा, अजय दुबे, निलेश खरबडे, दामोदर मंत्री, अमित कासनगोट्टूवार, देवेंद्र वाटकर, डॉ. मिलिंद दाभेरे, सुधाकर पारखी, सुनीता जयस्वाल तसेच विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार यांच्या या धडक पाहणीमुळे रेल्वे स्थानकांवरील रखडलेल्या कामांना आता वेग मिळण्याची चिन्हे असून, प्रवाशांनी या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button