
४२ अंशांच्या चटक्यांत वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार; वाहतूक पोलिसांच्या ‘मानवीय‘ निर्णयाचे कौतुक
गडचिरोली : जिल्ह्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. या भीषण उष्णतेत रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल लागल्यामुळे भर उन्हात ताटकळत उभे राहणे वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत होते. नागरिकांची हीच अडचण ओळखून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली वाहतूक शाखेने दुपारी १२:३० ते ४ वाजेपर्यंत शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे.
दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. अशा वेळी सिग्नलवर १ ते २ मिनिटे उभे राहणे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जनतेची मागणी रास्त मानली आणि सिग्नल यंत्रणा दुपारी बंद ठेवण्याची प्रक्रिया राबवली. यामुळे आता नागरिकांना चौकात न थांबता आपला प्रवास वेगाने पूर्ण करता येणार आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जरी सिग्नल बंद राहणार असले तरी, सायंकाळी ४:०० नंतर जेव्हा उन्हाची तीव्रता कमी होते आणि रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढते, तेव्हा सर्व सिग्नल यंत्रणा पुन्हा पूर्ववत केली जाईल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि प्रवाशांचा प्रवासही सुरक्षित राहील याची दक्षता घेतली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या या संवेदनशील आणि मानवीय भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. “केवळ नियम पाळणेच महत्त्वाचे नसून, जनतेच्या आरोग्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे,” हा संदेश या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. भर उन्हात सिग्नलवर ताटकळत उभे राहण्यापासून सुटका मिळाल्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या या निर्णयामुळे ‘खाकी’ वर्दीतील संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून, कडाक्याच्या उन्हात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खऱ्या अर्थाने ‘सावली’ मिळाली आहे.



