गडचिरोलीविदर्भ

राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

तहसील कार्यालयाजवळील घटनेने परिसरात खळबळ ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आरमोरी : शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या आदिवासी मुलींच्या वस्तीगृहासमोरील परिसरात रविवारी सायंकाळी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मयूर तुकाराम सोनकुसरे (वय २९) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर यांनी रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मयूर यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.

मयूर सोनकुसरे हे स्वभावाने अतिशय शांत, मनमिळावू आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागणारे होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असून रोजंदारीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मयूर यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने सोनकुसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनमिळावू स्वभाव असलेल्या मयूर यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आरमोरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button