
स्वच्छता, सुविधा आणि राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजाणीवर भर देण्याचे निर्देश
गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन तेथील स्वच्छता, सुरक्षा, औषध उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांसोबतचा सुसंवाद यांसारख्या निर्देशकांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअनुषंगाने अर्जुनी-मोरगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सुरेश धुर्वे, विलास कारेवार, दीपक चव्हाण, शैलेश तिवारी आणि झामसिंग गायकवाड उपस्थित होते. भेटीदरम्यान डॉ. कांबळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथील प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, आंतररुग्ण वार्ड, औषधी साठा, लस साठवणूक केंद्र इत्यादींची पाहणी केली. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे. सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे. बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देणे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे. पर्यवेक्षकांनी उपकेंद्रांना भेटी देऊन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेणे. हलचल रजिस्टरवर नोंदी करूनच मुख्यालय सोडणे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. जैविक घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे. जनआरोग्य समितीच्या सभा नियमित घेणे. कुपोषित अंगणवाडीतील बालकांची तपासणी करून त्यांना श्रेणीनुसार वर्गीकरण करणे आणि आवश्यक असल्यास ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथील एन.आर.सी. केंद्रावर भरती करण्याच्या सूचना दिल्या. टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारीमार्फत योग्य नियोजन करणे. गरोदर मातेला प्रसूतिपूर्व व प्रसूतीपश्चात नियमित सेवा देणे. पत्ता सीझनमध्ये स्थलांतरित लोकांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे. अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी करणे व आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे. अशा विविध सुचना दिल्या.
भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सिंधी मेश्राम यांच्यासह आरोग्य संस्थेतील संपूर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग, ज्यात आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आणि स्वच्छक उपस्थित होते.



