गडचिरोलीविदर्भ

रबी हंगामातील शेतमाल खरेदीसाठी शासकीय केंद्रे सुरू करा – काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे यांची मागणी

गडचिरोली : अल्प सिंचन सुविधांच्या भरवशावर रबी हंगामात मका व धान पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी पावसाळा तोंडावर असतानाही पुरेशा प्रमाणात शासकीय शेतमाल खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने अडचणीत सापडले आहेत. शासनाने तत्काळ शासकीय शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे यांनी केली आहे.

ॲड. कोवासे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात सिंचन सुविधा नसतानाही मागील काही वर्षांपासून बहुतांश सर्वच तालुक्यांमधील अनेक शेतकरी रबी हंगामात मका व धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. त्याअनुषंगाने दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात रबी हंगामातील शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनातर्फे खरेदी केंद्रे सुरू केली जात होती. तेथे शेतकरी शेतमाल विकून मिळालेल्या पैशातून दैनंदिन खर्च भागवत होते. शिवाय खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी व अन्य साहित्य खरेदीसाठी या रकमेची मदत होत होती. परंतु यंदा पावसाळा तोंडावर असतानाही पुरेशा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली नाहीत.

धान व मका विक्रीसाठी शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर चकरा मारत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील शेतमाल कुठे विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अलीकडेच सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रे सुरु न केल्यास धानाची होळी करण्याचा इशारा दिला आहे. हीच परिस्थिती जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली तालुक्यातही आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शासकीय शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावी अशी मागणी ॲड. विश्वजित कोवासे यांनी केली आहे. प्रशासन दखल घेत नसेल, तर जिल्हा काँग्रेस कमिटी शेतकऱ्यांसह मोठे आंदोलन उभारेल, असा इशाराही ॲड. कोवासे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button