गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीसाठी गोसेखुर्दचे दरवाजे उघडणार! ; ३ जूनपासून वैनगंगेत ४० क्युमेक्सने पाणी सोडण्याचे आदेश; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व सभापती लिलाधर भरडकर यांच्या पाठपुराव्याला यश; २५ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याटप्प्याने ३० जूनपर्यंत मिळणार

गडचिरोली : शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर राबविलेली मोहीम अखेरीस फळाला आली आहे. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी गेल्या सहा दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर लावून धरलेल्या धडक पाठपुराव्याला मोठे यश मिळाले. नागपूरच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली असून, ३ जून रोजी सकाळी ठीक ७:०० वाजतापासून गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे येत्या ५ जूनपासून गडचिरोली शहरवासीयांना सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोसेखुर्द धरण प्रकल्प कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, बुधवारी (३ जून) सकाळी ७ वाजता धरणाच्या पायथा विद्युत गृहमधून वैनगंगा नदीपात्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याकरिता सुरुवातीला ४० क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल. नदीतील पाण्याचा प्रवाह आणि शहराची आवश्यकता लक्षात घेऊन या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने आणखी वाढ केली जाऊ शकते. ३० जूनपर्यंत या धरण क्षेत्रातून टप्प्याटप्प्याने एकूण २५.०० दशलक्ष घन मीटर (MCM) पाणी सोडण्याची ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे.

शहरातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व सभापती लिलाधर भरडकर यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदने देऊन हा प्रश्न लावून धरला होता. या समस्येवर सहपालकमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून २९ मे रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर १ जून रोजी पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याला तत्परतेने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव १ जून रोजीच अधीक्षक अभियंता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता, ज्याला २ जून रोजी अधिकृत मंजुरी मिळाली.

गोसेखुर्दचे पाणी नदी पात्रात पोहोचल्यानंतर ते वाहून जाऊ नये आणि शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत योग्य पद्धतीने अडकता यावे, यासाठी नगर परिषदेने आधीच कंबर कसली आहे. वैनगंगा नदी पात्रात माती आणि रेती टाकून तात्पुरत्या बंधाऱ्याचे बांधकाम नगर परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. ३ जूनच्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, पाणी पोहोचताच शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.

बुधवारी सकाळी ७ वाजतापासून गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक आणि मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणाऱ्या नागरिकांनी, पशुपालकांनी आणि मच्छीमारांनी स्वतःची काळजी घ्यावी व पूर्णपणे सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपापल्या स्तरावर त्वरित संपूर्ण खबरदारी बाळगून स्थानिक नागरिकांना त्वरित सुचित करावे, असे आदेश कार्यकारी अभियंता गोसेखुर्द धरण प्रकल्प यांनी पारित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button